पमपा दशकपूर्ती निमित्त करण्यात आले महापौर नितीन भाई पाटील यांना सन्मानित महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पनवेल तालुका पत्रकार विकास मंच यांच्यावतीने मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्याने मराठी माझी देवालाही आवडे या संत गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगलेल्या सोहळ्याला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पनवेल महानगरपालिकेच्या दशकपूर्ती निमित्त महापौर नितीन भाई पाटील यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. तर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांचा सन्मान करण्यात आला. कल्पिता राणे यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमात मराठी भाषेच्या अभिजात प्रवासाचा लेखाजोखा संत गीते आणि नृत्यांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला. अत्यंत बहारदार झालेल्या कार्यक्रमाचा पनवेलकरांनी मनमुराद आनंद लुटला.डॉ. राम पंडित आणि तन्वी गोरे यांच्या सुमधुर गायनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.कल्पिता राणे यांनी प्रत्येक गीताला समर्पक नृत्याचा साज चढविल्याने कार्यक्रमाने एक अनोखी उंची गाठली. कार्यक्रमाच्या प्रारंभी आपले मनोगत व्यक्त करताना महापौर नितीन भाई पाटील म्हणाले की खऱ्या अर्थाने दशकपुर्तीच्या निमित्ताने होणाऱ्या सन्मानाचे खरे हक्कदार हे आमदार प्रशांत ठाकूर आहेत. महानगरपालिकेच्या निर्मितीमध्ये त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. आज महानगरपालिकेची निर्मिती झाल्यामुळे पनवेलच्या विकासाचा आलेख उंचावलेला असून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आगामी काळात पनवेलकरांच्या सेवेसाठी येऊ घातले आहेत. उपस्थित रसिक प्रेक्षकांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की हल्ली मी आलेल्या आमंत्रणांच्या पैकी फक्त दहा टक्के कार्यक्रमांना हजेरी लावायचा प्रयत्न करतो. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने मला या बहारदार कार्यक्रमाचे निमंत्रण दिले त्याच वेळी मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे असे ठरविले होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या निमित्ताने तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहात त्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन. पनवेल तालुका पत्रकार विकास मंच अशा सजक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याबद्दल त्यांचे मला फार कौतुक आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे देखील मी विशेषत्वाने आभार मानतो की त्यांनी या बहारदार कार्यक्रमासाठी पनवेल नगरीची निवड केली. या कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, नगरसेवक एडवोकेट मनोज भुजबळ, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधीक्षक आबासाहेब जगताप, पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार माधव पाटील, अध्यक्ष राजेंद्र पाटील, सल्लागार डॉक्टर संजय सोनावणे, सल्लागार संजय कदम, सल्लागार मंदार दोंदे, सरचिटणीस हरेश साठे, खजिनदार दत्ता कुलकर्णी, प्रवीण मोहोकर,नितीन कोळी, निलेश सोनावणे, लालचंद यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात मराठी माझी देवालाही आवडे कार्यक्रम संपन्नलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सन्माननीय उपस्थितीत रंगला संतगीतांचा सोहळा
लेखक:

