पनवेल, दि: २१ ऑक्टोबर, २०२६:
महावितरणच्या रायगड जिल्ह्यातील उपकेंद्राला प्रथमच ISO 9001:2015 हे मानांकन प्राप्त झाले आहे. पनवेल ग्रामीण विभागांतर्गत नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या गोदरेज सिटी, खानावळे येथील २० एमव्हीए क्षमतेच्या ३३/२२ केव्ही उपकेंद्राला हे मानांकन मिळाले असून, या प्रमाणपत्राचे औपचारिक वितरण महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सह-व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे (भा प्र से) यांच्या शुभ हस्ते दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले. या उपकेंद्राचे तसेच नव्याने निर्माण करण्यात आलेल्या खानावळे शाखा कार्यालयाचे उद्घाटनही यावेळी श्री. दिलीप जगदाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पनवेल परिसरात झपाट्याने नागरीकरण होत असून, नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे अनेक नवीन गृहप्रकल्प आणि अन्य विकासकामे आकाराला येत आहेत. या वाढत्या नागरीकरणामुळे भविष्यात विजेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ही वाढती गरज लक्षात घेऊन उभारण्यात आलेले २० एमव्हीए क्षमतेचे हे नवीन उपकेंद्र परिसरातील वीजपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत करणार आहे. त्यामुळे वाढत्या वीजभाराचे नियोजन आणि ग्राहकांना दर्जेदार वीजसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या उपकेंद्राचे महत्त्व अधोरेखित होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व महावितरण भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. संजय पाटील, पेण मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री. धनराज बिक्कड, पनवेल ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री दिवाकर देशमुख, भांडुप परिमंडलाचे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) श्री. देवेंद्र गिल्लुरकर, कार्यकारी अभियंते श्री. शैलेश महाजन, श्री. रामकृष्ण पाटील, श्री. भगत, श्री साळी, श्री. उमेश चव्हाण, अति. कार्यकारी अभियंता, श्री. संजय ठाकूर तसेच महावितरणचे अन्य उपविभागीय, शाखा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे म्हणाले, “पनवेल ग्रामीण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांतून आणि दुरुस्ती व देखभालीच्या कामांतून ही देखणी व महत्त्वपूर्ण वास्तू उभी राहिली आहे. यासाठी आपण सर्वजण कौतुकास पात्र आहात. रायगड जिल्हा हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास होत असून, जिथे उत्तम सुविधा आणि दर्जेदार पायाभूत संसाधने उपलब्ध असतात, तिथेच वास्तव्य करण्यास प्रत्येकजण प्राधान्य देतो. ISO मानांकन मिळवणे ही अत्यंत आव्हानात्मक प्रक्रिया आहे. आपण सर्वांनी मेहनत, जिद्द आणि समर्पणाच्या जोरावर हे मानांकन मिळवले आहे. मात्र, हे यश टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने या वास्तूची आणि व्यवस्थेची मालकीभावनेतून जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. ‘हा विभाग माझा आहे’ या भावनेतून प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने काम केल्यास आपण या यशाचा आलेख आणखी उंचावू शकतो.
यावेळी त्यांनी महावितरणच्या भांडुप परिमंडलाने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ केलेल्या उल्लेखनीय कामाचे कौतुक केले. तसेच, कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांसाठी करण्यात येणारी चांगली कामे विविध जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. “आपण केलेल्या चांगल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचल्यास संस्थेची प्रतिमा अधिक उजळते आणि जनतेचा विश्वासही दृढ होतो,” असेही त्यांनी सांगितले.
ISO 9001:2015 हे गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठीचे आंतरराष्ट्रीय मानांकन आहे. या मानांकनामुळे उपकेंद्राच्या कामकाजातील गुणवत्ता व्यवस्थापन आणि निर्धारित कार्यपद्धतींचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. रायगड जिल्ह्यातील उपकेंद्राला प्रथमच मिळालेला हा बहुमान आणि खानावळे येथे सुरू झालेले नवीन शाखा कार्यालय हे महावितरणच्या पायाभूत सुविधा बळकटीकरणाच्या तसेच ग्राहकाभिमुख सेवा विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
यावेळी मुख्य अभियंता श्री. संजय पाटील म्हणाले, “रायगड जिल्ह्यात अनेक अत्याधुनिक प्रकल्प उभारले जात असून, या प्रकल्पांना अखंडित वीजपुरवठा मिळण्याची अपेक्षा आहे. ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी केवळ नवीन पायाभूत सुविधा उभारणे पुरेसे नसून, त्यांची योग्य देखभाल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी योग्य अर्थिंग, विद्युत सुरक्षेच्या निर्धारित मानकांचे व कार्यपद्धतींचे काटेकोर पालन, आवश्यक नोंदींचे नियमित संधारण आणि योग्य ऊर्जा परीक्षण (एनर्जी ऑडिट) करणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले, “जितके कठीण ISO मानांकन मिळवणे आहे, त्यापेक्षाही ते सातत्याने टिकवून ठेवणे अधिक आव्हानात्मक आहे. आपल्या शरीरात ज्या प्रकारे हृदय काम करतो त्याच प्रकारे विद्युत यंत्रणे मध्ये उपकेंद्राची महत्वपूर्ण भूमिका असते. रायगड जिल्ह्यासाठी पुढील दहा वर्षे हा विकासाचा सुवर्णकाळ ठरणार आहे. या विकासात ऊर्जा क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. त्यामुळे आपण अखंडित सेवा देण्यासाठी नवीन उपकेंद्रे उभरात आहोत पण ती सक्षमपणे कार्यरत ठेवण्याची आणि त्यांची योग्य देखभाल करण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे.”

