संभाव्य दुष्काळ परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पनवेल महानगरपालिका सज्ज

लेखक:

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आणि पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या सहकार्याने आयोजित “माझी मराठी देवालाही आवडे” या संतगीतांच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी आलेल्या मंचाच्या शिष्टमंडळाशी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीतील अनेक प्रश्नांबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.

अल निनोमुळे यावर्षी भारतातील सरासरी पर्जन्यमान कमी राहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, अन्य ठिकाणी त्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरू आहे. पनवेल महानगरपालिका हद्द तसेच तालुका हद्दीतही एकूण पाऊस सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी राहिला आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे जावे लागू शकते. या पार्श्वभूमीवर आयुक्त मंगेश चितळे यांनी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार डॉ. संजय सोनावणे, सल्लागार संजय कदम, सल्लागार मंदार दोंदे आणि खजिनदार दत्ता कुलकर्णी यांच्यासमवेत संवाद साधला.

पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना

आयुक्त मंगेश चितळे म्हणाले की, यापूर्वीच ८३ विहिरींमधील गाळ काढून त्यांची साठवणूक क्षमता वाढविण्यात आली आहे. रोज अतिरिक्त २ एमएलडी पाणी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. टँकर पॉइंट्सचे सर्वेक्षण झाले असून, पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व टँकर्सवर जीपीएस कार्यरत असेल. प्रत्येक टँकरवर अदा करायचे मूल्य लिहिलेले असणार आहे. तसेच ते यूपीआयद्वारे थेट खात्यात जमा होण्यासंदर्भातही उपाययोजना करण्यात येणार आहेत. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची तयारी आहे. जिथे पाणीगळती होते अशा ठिकाणी तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. संभाव्य पाणीचोरी लक्षात घेता सतर्क राहून त्यावर निर्बंध घालण्यात येतील.

आयुक्त मंगेश चितळे पुढे म्हणाले की, पनवेल महानगरपालिका मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांनजीक आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अर्थार्जनासाठी येणाऱ्या अन्य जिल्ह्यांतील नागरिकांचे प्रमाणही वाढू शकते. या सर्व बाबींचा विचार करून काटेकोर नियोजन केले आहे.

आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका संभाव्य दुष्काळ परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाल्यामुळे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या शिष्टमंडळाने त्यांचे अभिनंदन केले. आपत्कालीन परिस्थितीत पत्रकार विकास मंच प्रशासनासोबत उभा राहील, अशी ग्वाहीही देण्यात आली.


Discover more from पनवेल गावकरी संकेत

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading