पनवेल/ नवी मुंबई (प्रतिनिधी ) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपल्या देशांतर्गत हवाई मार्गांच्या जाळ्याचा विस्तार करत अगत्ती (गोवा–मोपा मार्गे), दरभंगा, गुवाहाटी, जळगाव, जोधपूर, रांची, बागडोगरा, सिंधुदुर्ग आणि उदयपूर या नऊ नव्या ठिकाणांचा समावेश केला आहे. या विस्तारामुळे प्रादेशिक हवाई जोडणी अधिक मजबूत होणार असून, भारतातील विविध पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.
नव्या हवाई मार्गांमुळे प्रवाशांना विविध पर्यटनस्थळे, सांस्कृतिक केंद्रे आणि प्रादेशिक बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याची सुविधा मिळणार आहे. अगत्ती येथे गोवा–मोपा मार्गे जाता येणार असून, त्यामुळे लक्षद्वीपमधील बेटे आणि सागरी पर्यटनासाठी प्रवेशमार्ग उपलब्ध होणार आहे. दरभंगा येथील हवाई जोडणीमुळे बिहारमधील मिथिला प्रदेशात जाणे सुलभ होणार आहे. तर गुवाहाटी मुळे आसाम आणि ईशान्य भारतातील वन्यजीव, नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा अनुभवण्यासाठी प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहे. जळगाव येथून उत्तर महाराष्ट्र आणि अजिंठा या ऐतिहासिक वारसास्थळांच्या पर्यटन क्षेत्रात जाणे सोयीचे होणार आहे.
जोधपूर आणि उदयपूर या शहरांमुळे राजस्थानातील किल्ले, राजवाडे, तलाव आणि विवाह सोहळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे सुलभ होणार आहे. रांची येथील हवाई जोडणीमुळे झारखंडमधील धबधबे, जंगले आणि पर्यावरणपूरक पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचता येणार आहे. तर सिंधुदुर्ग येथील हवाई जोडणीमुळे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनारे, किल्ले आणि जलक्रीडा तसेच जलपर्यटनाच्या विविध अनुभवांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे. बागडोगरा येथून उत्तर बंगालमधील चहाचे मळे, हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश तसेच दार्जिलिंग, कालिम्पोंग आणि सिक्कीम यांसारख्या लोकप्रिय पर्यटनस्थळांपर्यंत सहज पोहोचता येणार आहे. यामुळे पूर्व हिमालयीन पर्यटन क्षेत्राशी हवाई जोडणी अधिक मजबूत होणार आहे.एकूणच, या नव्या हवाई मार्गांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांसाठी प्रवासाचे पर्याय वाढणार असून, पश्चिम, उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील बेटांवरील पर्यटन, किनारपट्टीवरील पर्यटन, ऐतिहासिक वारसा, वन्यजीव, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक पर्यटनस्थळांशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारणाऱ्या देशांतर्गत हवाई मार्गांच्या जाळ्यासह वाढत्या प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमधून मुंबई महानगर प्रदेशाला आणि त्यापलीकडील भागांना कार्यक्षम हवाई जोडणी उपलब्ध करून देण्याची आमची बांधिलकी अधोरेखित होते. या नव्या हवाई मार्गांमुळे महत्त्वाच्या प्रादेशिक बाजारपेठांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल आणि पर्यटन, व्यापार तसेच आर्थिक विकासाला चालना मिळेल,” असे NMIA च्या प्रवक्त्याने सांगितले.

