नवीन पनवेल प्रभाग १७ मधील खराब रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करा!नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची महापौर नितीन पाटील यांच्याकडे मागणी

लेखक:

पनवेल (प्रतिनिधी) : नवीन पनवेल प्रभाग क्रमांक १७ मधील महानगरपालिकेच्या विविध विकासकामांसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन पनवेल प्रभाग क्रमांक १७ मधील विविध भागांत महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या विकासकामांसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, संबंधित कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रभागातील बहुतांश रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्त्यांचा पृष्ठभाग उखडला आहे.

रस्त्यांच्या या दुरवस्थेमुळे नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. याशिवाय, वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यांवरील धूळ मोठ्या प्रमाणात हवेत पसरत असून, परिसरातील नागरिकांना धुळीच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळा संपल्यानंतरही प्रभागातील रस्त्यांची परिस्थिती सुधारलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या समस्येकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले आहे.

प्रभागातील नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापौर नितीन पाटील यांनी संबंधित विभागाला तातडीने आवश्यक आदेश द्यावेत. तसेच नवीन पनवेल प्रभाग क्रमांक १७ मधील सर्व खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची आणि डांबरीकरणाची कामे लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावीत, अशी मागणी अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी निवेदनातून केली आहे.


Discover more from पनवेल गावकरी संकेत

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading